कोविड-19 रोगनिवारण आणि उपचारपद्धती: सद्यस्थिती आणि भविष्यातील शक्यता
सद्याच्या कोविड-19 (सार्स-कोवी-2) महामारीमुळे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवांना अभूतपूर्व उपाययोजना करायला भाग पाडले आहे. जगातील अनेक देशांनी टाळेबंदी, सामाजिक (शारीरिक) अंतर ठेवणे, तोंडावर मास्क लावणे यांसारखे कडक निर्बंध लागू केले असताना कोविड-19 वर कोणती औषधे परिणामकारक ठरतील याचीही चाचपणी चालू केली आहे.
कोविड-19 रोगावर केले जाणारे सद्यस्थितीतील उपचार आणि भविष्यातील उपचारांची शक्यता यासंबंधी करिश्मा कौशिक यांनी पाच महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. करिश्मा कौशिक या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी (पुणे) येथे इन्स्टिट्यूट ऑफ बायोइंफर्मेटिक्स अॅन्ड बायोटेक्नॉलजी विभागात असिस्टंट प्रोफेसर आणि रामलिंगस्वामी रि-एंट्री फेलो आहेत.
प्रश्न 1: कोविड-19 रोगावर प्रभावी उपचार आहेत का?
उत्तर: आताच्या घडीला, कोविड-19 वर उपचार करण्यासाठी किंवा तो रोखण्यासाठी कोणतेही औषध, उपचारपद्धती किंवा इतर तत्सम औषधांचे प्रकार उपलब्ध नाहीत. याचा अर्थ असा की खासकरून या विषाणूला लक्ष्य करण्यासाठी कोणतेही मान्यताप्राप्त औषध वापरात नाही.
परंतु याचा अर्थ असाही नाही की कोविड-19 रुग्णांमध्ये संसर्गामुळे आढळणारी लक्षणे दूर करण्यासाठी कोणतेही उपचार नाहीत किंवा या संसर्गातून रुग्ण बरे होऊ शकणार नाहीत. बहुतेक रुग्ण त्यांच्या अंगी असलेल्या शारीरिक प्रतिकारशक्तीच्या बळावर (शारीरिक प्रतिक्षमता) आणि त्याचबरोबर त्यांच्यावर केलेल्या आधारदायी उपचारांमुळे रोगाशी मुकाबला करून बरे होऊ शकतात.
तसेच, हा काही पहिला किंवा केवळ असा विषाणूजन्य संसर्ग नाही की त्यावर ठराविक उपचार नाहीत. उदा. २००३ साली जेव्हा सार्स चा उद्रेक झाला, तेव्हादेखील त्या विषाणूला लक्ष्य करू शकतील असे खास उपचार नव्हते. परंतु सार्सची साथ रोखण्यासाठी काही उपाय केले गेले. जसे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून संसर्गाची साखळी तोडणे, रुग्णांवर कडक पाळत ठेवणे, रुग्णांचे विलगीकरण करणे आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधी धोरणांचे पालन करणे इत्यादी. अशा प्रकारे सार्सच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
नैसर्गिक प्रतिकारशक्ती चांगली राखून जोडीला आधारदायी उपचार घेतल्यास कोविड-19 च्या बहुतेक सर्व रुग्णांना संसर्गापासून बरे व्हायला मदत होते.
प्रश्न २: सद्यस्थितीत कोविड-19 रुग्णांवर कोणते उपचार केले जात आहेत?
उत्तर: सद्यस्थितीत कोरानाविषाणूंचा नाश करेल असे कोणतेच मान्यताप्राप्त औषध नसल्याने किंवा औषधोपचार नसल्याने कोविड-19 च्या रुग्णांना आधारदायी उपचार केले जाऊन त्यांची लक्षणे दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोविड-19 रोगामुळे श्वसन संस्था बाधित होते आणि रुग्णांमध्ये सामान्यपणे ताप येणे, खोकला येणे, थकवा येणे, तसेच श्वास घ्यायला त्रास होणे (काही जणांमध्ये तो खूपच त्रासदायक असतो) इत्यादी लक्षणे दिसून येतात. इतर लक्षणांमध्ये घसा खवखवणे, डोकेदुखी, तोंडाची चव जाणे आणि वास न ओळखता येणे अशीही लक्षणे आढळून येतात.
आधारदायी उपचारांमध्ये सामान्यपणे रुग्णांमधील लक्षणे दूर होण्यासाठी उपचार केले जातात. जसे, ताप वाढल्यास ताप कमी होण्यासाठी औषध देणे, अंगदुखीवर दाहनाशक औषधे देणे आणि तीव्र संसर्ग असल्यास म्हणजेच श्वास घ्यायला त्रास होत असल्यास ऑक्सिजन देणे आणि जीवनदायी प्रणालींचा (व्हेंटीलेटर) वापर करणे इत्यादी.
प्रश्न ३: कोविड-19 रोगावर आपण प्रतिजैविकांचा वापर करू शकतो का?
उत्तर: प्रतिजैविके जीवाणूंच्या विरोधात कार्य करतात आणि म्हणून जीवाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जीवाणूंची संरचना, प्रक्रिया या बाबी जीवाणूंसाठी खास आणि एकमेव म्हणता येतील अशा असतात. अशा वैशिष्ट्यपूर्ण संरचनांमध्ये फेरबदल करण्याचे किंवा त्यांच्या प्रक्रियांमध्ये अडथळा आणण्याचे काम प्रतिजैविके करतात. परंतु विषाणूंमध्ये अशी खास वैशिष्टे नसतात. उदाहरणार्थ, जीवाणू आणि विषाणू यांचे बाह्यावरण, प्रतिकृतीकरण प्रक्रिया आणि त्यांसंबंधी लागणारी प्रथिने किंवा विकरे इत्यादी बाबी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दुर्दैवाने प्रतिजैविके कोविड-19 वर प्रभावी ठरत नाहीत.
मात्र कोविड-19 च्या संसर्गामुळे श्वसन संस्थेतील खासकरून फुफ्फुसांतील पेशींची हानी होते. अशा परिस्थितीत काही रुग्णांना फुफ्फुसांमध्ये विषाणूबरोबरच जीवाणूंचादेखील संसर्ग होऊ शकतो आणि अशा रुग्णांना प्रतिजैविक औषधांची गरज भासू शकते.
कोविड-19 रुग्णाच्या श्वसन संस्थेतील पेशींची काय स्थिती होते ते पहा.
प्रश्न ४. कोविड-19 वरील उपचारपद्धतींचा विकास आणि त्यांचे मूल्यमापन यांबाबत वैज्ञानिक आणि वैद्यकीय संशोधन यांबाबत काय स्थिती आहे?
उत्तर: कोणत्याही नवीन औषधनिर्मितीची प्रक्रिया वेळखाऊ असते आणि त्याला काही वर्षे लागतात, अगदी काही दशके देखील त्यासाठी लागू शकतात. यामागील कारण असे की औषधाची कार्यक्षमता, सुरक्षितता, औषधाची पथ्ये आणि औषधाचे दुष्परिणाम इत्यादी बाबींचा अभ्यास करायला वेळ लागतो. हे सर्व अभ्यास किंवा संशोधन प्रयोगशाळेत सुरू होते, त्यानंतर या संभाव्य औषधांची चाचणी प्राण्यांवर करावी लागते आणि सरतेशेवटी मानवी चिकित्सा चाचण्या (क्लिनीकल ट्रायल्स) घेतल्या जातात.
औषधाच्या विकासातील विविध टप्पे
कोविड-19 च्या उपचारपद्धतीत एक दृष्टिकोन असाही आहे की प्रचलित औषधांची परिणामकारकता शोधणे. यामुळे पूर्णपणे नवीन औषधाच्या निर्मितीसाठी जो मोठा कालावधी लागतो, तो कालावधी वाचू शकतो. तसेच वापरात असलेल्या औषधाच्या वापराकरिता लवकर मान्यता मिळवता येऊ शकते आणि कोविड-19 रोगावर त्याचा वापर करता येऊ शकतो. कारण एखादे प्रचलित औषध इतर रोगांवर वापरताना हे प्रचलित औषध क्रिया कसे करते, त्याचे दुष्परिणाम, सुरक्षितता, मात्रा किती द्यायची इत्यादी बाबींचा अभ्यास आधीच झालेला असतो. असे जरी असले, तरी प्रचलित संभावित औषधे कोविड-19 रोगावर परिणामकारक ठरतात किंवा नाही हे पद्धतशीरपणे पाहावे लागतेच. यासाठी कोविड-19 बाधित रुग्णांवर चिकित्सा चाचण्या नियमित पद्धतीने कराव्या लागतात.
विस्ताराने सांगायचे झाल्यास, प्रयोगशाळेत उमेदवार औषधाची निवड करताना प्रथम कोरोनाविषाणूतील (सार्स-कोवी-2) प्रथिनाचे विश्लेषण केले जाते आणि विषाणूतील घटकांना मारक ठरतील अशा औषधी कारकांचा शोध घेतला जातो किंवा विषाणूच्या विरोधात परिणामकारक ठरतील अशा औषधी कारकांचा अंदाज घेतला जातो. अशावेळी उपचारासाठी निवडलेले औषध मान्यताप्राप्त आहे किंवा नाही, उपलब्ध आहे किंवा नाही, तसेच ते सर्वांना मिळेल किंवा नाही हेही पाहाणे आवश्यक असते. कोविड-19 रोगावर अनेक औषधांच्या चिकित्सा चाचण्या चालू असून त्यांबाबत अंदाज घेतला जात आहे. यात प्रायोगिक स्तरावरील विषाणूरोधी रेमडेसीवीर, हिवतापरोधी क्लोरोक्विन, एडसरोधी दोन औषधांचा संयुक्तरीत्या वापर आणि वर उल्लेख केलेल्या विषाणूंचे प्रतिकृतीकरण रोखणाऱ्या (अँटिरिट्राव्हायरल) दोन औषधांबरोबरच, प्रतिक्षम संस्थेत बदल करणाऱ्या औषधांचाही (इंटरफेरॉन) वापर केला जात आहे.
प्रश्न ५: या चिकित्सा चाचण्यांची सद्यस्थिती काय आहे आणि त्या किती आशादायी आहेत?
उत्तर: चिकित्सा चाचण्या सध्या चालू आहेत आणि ही स्थिती वेगाने बदलत आहे. मात्र रेमडेसीवीर आणि क्लोरोक्विन या दोन औषधांनी (कारक) सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, आणि हेच आतापर्यंतच्या निकालांतील सार आहे, असे सांगता येईल.
रेमडेसीवीर: या औषधाच्या प्रयोगातून विषाणूच्या प्रतिकृती तयार होण्याची प्रक्रिया रोखली जाते असे दिसून आले आहे, तसेच ते कोरोनाविषाणूच्या कुलातील सर्व विषाणूंच्या विरुद्ध म्हणजे अगदी कोविड-19 या रोगकारक विषाणूच्या विरुद्ध परिणामकारक असल्याचे आढळले आहे. प्राथमिक माहितीनुसार कोविड-19 रोगाचे जे गंभीर रुग्ण आहेत अशा रुग्णांमध्ये हे औषध गुणकारी दिसून येत आहे; अशा रुग्णांना औषध दिल्यावर त्यांना ऑक्सिजन कमी द्यावा लागत आहे, तसेच जीवनरक्षक प्रणालीची गरज कमी पडत आहे. मात्र या औषधाच्या चिकित्सा चाचण्या मर्यादित प्रमाणात केलेल्या असून त्यांची तुलना ज्यांना औषध दिलेले नाही अशा गटाबरोबर (नियंत्रक गट) केलेली नाही आणि त्यामुळे हे औषध विषाणूंची संख्या कमी करते किंवा नाही, याची पुष्टी होत नाही. चीनमधील हुबै येथे वेगळेपणाने चिकित्सा चाचण्या करताना दहा रुग्णालयातील रुग्णांना हे औषध दिले हाते. या औषधामुळे कोविड-19 रुग्णांच्या प्रकृतीत विशेष फरक पडला नाही, मात्र ज्या रुग्णांना हे औषध दिले ते रुग्ण लवकर बरे झाल्याचे यातून दिसून आले आहे. अर्थात रुग्णांची संख्या त्या मानाने खूपच कमी होती आणि २३७ रुग्णांपैकी फक्त १५८ रुग्णांना रेमडेसीवीर देण्यात आले होते. मात्र पुढच्या अभ्यासासाठी ही जमेची बाब आहे, हे दिसून येते.
क्लोरोक्विन: कोरोनाविषाणूंचा संसर्ग टाळण्याकरिता आणि संपर्क झाल्यानंतर कोविड-19 रोगावर उपचार करण्यासाठी क्लोरोक्विन या हिवतापावरील औषधाच्या (हायड्रॉक्सी क्लोरोक्विन) चिकित्सा चाचण्या घेण्यात येत आहेत. २००५ साली प्रयोगशाळेत केलेल्या एका अभ्यासात क्लोरोक्विन हे औषध सार्स विषाणूंविरुद्ध गुणकारी असल्याचे दिसून आले; पेशी-संवर्धन तंत्र वापरून केलेल्या या प्रयोगात क्लोरोक्विनमुळे विषाणूंच्या वाढीला आळा बसल्याचे आढळून आले होते.
कोविड-19 रोगावर उपचारासाठी रेमडेसीवीर आणि क्लोरोक्विन या संभावित औषधांचा वापर करता येईल का म्हणून शोध घेतला जात आहे.
नुकतेच हे औषध मानवामध्ये चिकित्सा चाचण्यांसाठी वापरण्यात आले आणि या औषधाची परिणामकारता, तसेच विषाणू नष्ट करणे, ताप कमी करणे यांबाबत काही मर्यादित स्वरूपात परिणाम होऊ शकतात, असे वेगवेगळे अहवाल मिळाले आहेत. मात्र हे अभ्यास रुग्णांच्या लहान गटांबरोबर केले गेले आहेत. त्याचबरोबर काही वेगळ्या अहवालांनुसार हिवतापावरील वरील औषधाबरोबरच इतर विषाणूरोधी औषधे आणि दाहनाशक औषधेही दिली गेली आहेत. त्यामुळे नेमका परिणाम क्लोरोक्विन किंवा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा आहे, हे स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. कोणत्याही परिस्थितीत, सार्स-कोवी-2 या कोरोनाविषाणूवर क्लोरोक्विन औषधाचा परिणाम हा हिवतापाच्या परजीवीवरच्या परिणामापेक्षा निश्चितच वेगळा असू शकतो (या दोन सूक्ष्मजीवांच्या संरचनेतील फरकामुळे हे शक्य आहे).
एक निश्चित आहे की कोविड-19 रोगावर उपचार शोधण्यासाठी संशोधन आणि चिकित्सा चाचण्या वेगाने होत असून हे पाऊल योग्य आहे असे म्हणता येईल. मात्र या प्रयोगाकरिता वापरण्यात आलेल्या औषधांच्या विश्लेषणांचे निकाल अनिर्णायक आहेत. फारफार तर, या प्रयोगांनी थोडा आशेचा किरण दाखवला असे आपण म्हणू शकतो. कोविड-19 रोगावर औषधांचा वापर करताना आणि त्यांची परिणामकारकता पाहताना यासंबंधीची माहिती मिळण्यासाठी अजून संशोधन करणे, गरजेचे आहे.
चित्ररूपांतर: प्रणाली परब