खवल्या मांजर: कोरोना विषाणूचा दरम्यानचा वाहक?

Share
Pangolins

चित्र: Pixabay

 


नेचर या मान्यवर संशोधनपत्रिकेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात चीनमध्ये आढळणाऱ्या मलेशियन खवल्या मांजरात (पँगोलिन) आढळून येणाऱ्या कोरोनाविषाणूंमध्ये सार्स-कोवी-2 शी संबंधित कोरोनाविषाणूही आहेत, असे दाखवून दिले गेले आहे. 

सार्स-कोवी-2 कोरोनाविषाणूचा प्रसार चीनमधील वुहान शहरातील हुनान मासळी बाजारापासून (हुनान सीफूड मार्केट) झाला, असे मानले जाते. याआधी, २००२ साली सार्स विषाणूचा उद्रेक अशाच ओल्या बाजारापासून (वेट मार्केट) झाला असावा, असा अंदाज आहे. कोरोनाविषाणूच्या उद्रेकानंतर वुहान येथील बाजार लगेच उठवून साफसूफ करण्यात आला. त्यामुळे या विषाणूचा उगम कोठून झाला, हे ओळखणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. या नवीन कोरोनाविषाणूचा मूळ स्रोत वटवाघळे आहेत असे मानले जात असले, तरी या विषाणूचा मनुष्यापर्यंत प्रसार होताना एखादा दरम्यानचा किंवा मध्यस्थ वाहक प्राणी (इंटरमिडिएट ॲनिमल कॅरियर) असावा.

खवल्या मांजर हा संपूर्ण जगात सर्वाधिक तस्करी होणारा सस्तन प्राणी आहे. त्यांचा उपयोग अन्न म्हणून आणि पारंपारिक औषधात केला जातो. या आधी सार्स-कोवी-2 संबंधित कोरोनाविषाणू वटवाघळांमध्ये सापडलेले आहेत, परंतु इतर वन्य प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे विषाणू आढळून आलेले नाहीत.

इतर सस्तन प्राण्यांमध्ये सार्स-कोवी-2 संबंधित कोरोनाविषाणू आहेत किंवा नाहीत, हे तपासून पाहण्यासाठी हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी दक्षिण चीनमधील खवल्या मांजरांमधील कोरोना विषाणूंचा आरएनए अनुक्रम अभ्यासला. २०१७ च्या अखेरीस आणि २०१८ च्या सुरुवातीला खवल्या मांजरांच्या तस्करीविरोधात ग्वांग्क्षी (Guangxi) येतील कस्टम अधिकाऱ्यांनी राबविलेल्या मोहिमेत या प्राण्यांच्या गोठवलेल्या ऊतींचे १८ नमुने हाती लागले होते. ते नमुने संशोधकांनी मिळवले आणि अभ्यासाकरिता वापरले.

संशोधकांना आरएनए अनुक्रमांवरून, ४३ पैकी ६ नमुन्यांमध्ये कोरोनाविषाणू आहेत असे दिसून आले, परंतु या अभ्यासामध्ये त्या नमुन्यांच्या आरएनएचे संपूर्ण अनुक्रम सापडले नाहीत. म्हणून संशोधकांनी कोरोनाविषाणूंच्या ज्ञात जीनोमवर आधारलेली प्रायोगिक पद्धती वापरून सहाही नमुन्यांतील कोरोनाविषाणूचे संपूर्ण जीनोम तयार केले. त्यावरून हे कोरोनाविषाणू आणि सार्स-कोवी-2 विषाणू यांच्यात जवळचा संबंध असल्याचे दिसून आले.

या ६ जीनोम अनुक्रमांच्या आधारे, संशोधकांनी खवल्या मांजरांच्या ऊतींच्या पूर्वी साठवून ठेवलेल्या नमुन्यांचादेखील अभ्यास केला. हे नमुने २०१८ सालच्या मध्यात ग्वांग्क्षी येथून आणि २०१९ सालच्या सुरुवातीला ग्वांगझ्याऊ (Guangzhou) येथून गोळा केले गेले होते.

या सर्व नमुन्यांच्या अभ्यासातून संशोधकांना असे दिसून आले की खवल्या मांजरांतील कोरोनाविषाणू आणि सार्स-कोवी-2 विषाणू यांच्या जीनोम अनुक्रमांमध्ये ८५.५–९२.४% साम्य आहे, आणि खवल्या मांजरांच्या कोरोनाविषाणूंमध्ये जनुकीयदृष्ट्या दोन भिन्न वंशावळी आहेत. आश्चर्य म्हणजे खवल्या मांजरातील विषाणूंच्या एका वंशावळीचा गट आणि मनुष्याला बाधा करणारा सार्स-कोवी-2 विषाणू यांच्यात - सार्स-कोवी-2 विषाणू ज्या प्रथिनाद्वारे मनुष्याच्या पेशींशी एका ग्राहीद्वारे जोडला जातो त्या प्रथिनामध्ये - ९७.४% साम्य आहे.

हे निष्कर्ष काय सांगतात? तर खवल्या मांजरासारखा एखादा प्राणी मनुष्यात या विषाणूंचा प्रसार होण्यासाठी मध्यस्थ आश्रयी म्हणून सहभागी असू शकतो. खवली मांजरे आणि वटवाघळे या दोन सस्तन प्राण्यांना सार्स-कोवी-2 संबंधित कोरोनाविषाणू संसर्ग करू शकतात. खवल्या मांजरांना संसर्ग वटवाघळांपासून झाला होता की आणखी दुसऱ्या प्राण्यापासून संसर्ग झाला होता, हे अजून हे स्पष्ट झालेले नाही. विषाणूच्या प्रसाराचा संपूर्ण घटनाक्रम जोपर्यंत नीट समजत नाही, तोपर्यंत खवल्या मांजरांची यात निश्चित काय भूमिका असते, हे एक गूढच राहील!

 

लेखकाविषयी: अदिती कर्मकार या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेटल रिसर्च, मुंबई या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. सध्या त्या एका औषध कंपनीत वैद्यकीय लेखक म्हणून कार्यरत असून फावल्या वेळात विज्ञान लेखन करतात.