भारतातील कडाक्याचा उन्हाळा कोविड-19 पासून संरक्षण देईल का?
भारतातील कडक उन्हाळा त्रासदायक म्हणून प्रसिद्ध असूनही आपल्या सर्वांना हा ऋतू हवाहवासा वाटतो. समुद्रकिनाऱ्यावर घालविलेल्या सुट्ट्या, आंब्यांसाठी संपत आलेली दीर्घ प्रतिक्षा आणि पापड, लोणची यांच्या बेगमीचा हा हंगाम असतो. मात्र यावेळी उन्हाळ्यातील रणरणत्या उष्णतेमुळे कोरोनाविषाणूचा (सार्स-कोवी-2) संसर्ग आटोक्यात येऊन जीवनमान पुन्हा पूर्वपदावर येईल, अशा आशेची त्यात भर पडली आहे.
या भाकिताचे मूळ ‘काही विषाणूजन्य आजार हे ऋतुंनुसार येतात’ या अनुभवात आहे. उदाहरणार्थ, फ्ल्यू या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या इन्फ्लुएन्झाच्या विषाणूला कोरडे आणि थंड वातावरण पोषक असते. त्यामुळे हिवाळ्यात फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. याचप्रमाणे कोरोनाविषाणूच्या कुलातील विषाणूंमुळे पसरलेले आजपर्यंतचे संसर्गजन्य आजार विशिष्ट ऋतुंमध्ये पसरत असत.
ऋतुमानानुसार कोरोनाविषाणूच्या (सार्स-कोवी-2) संसर्गाच्या प्रमाणात कदाचित चढउतार होतात किंवा नाही, याचा अंदाज बांधण्यासाठी शास्त्रज्ञ कोरोनाविषाणूला (सार्स-कोवी-2) पोषक ठरणाऱ्या वातावरणाची स्थिती समजून घेत आहेत.
लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात असा सांगितले आहे की कोरोनाविषाणू (सार्स-कोवी-2) उच्च तापमानाला अस्थिर बनतो. यासाठी विषाणू वहन माध्यमात (या माध्यमात विषाणूंचे नमुने गोळा करतात, वहन करतात, नमुन्यांची काळजीपूर्वक हाताळतात, तसेच दीर्घकाळ टिकण्यासाठी शीत वातावरणात साठवितात) वरील कोरोनाविषाणू ०० ते ७०० सें. यादरम्यान पाच वेगवेगळ्या तापमानांला ठेवण्यात आले. त्यानंतर ५ मिनिटांपासून ते १४ दिवसांपर्यंतच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी त्याच्या संसर्गी निर्देशांकाची (इन्फेक्टिव्ह इंडेक्स) चाचणी घेण्यात आली. यातून असे आढळून आले की, ४० सें. एवढ्या कमी तापमानाला (घरगुती शीतकपाटाचे अंतर्गत तापमान) हा विषाणू दोन आठवड्यांपर्यंत टिकून राहतो. साधारणपणे आपल्या नेहमीच्या पर्यावरणाच्या तापमानाला म्हणजे २२० सें. तापमानाला हा आठवडाभर सक्रिय राहतो. जेव्हा मानवी शरीराच्या तापमानाला म्हणजे ३७० सें. तापमानाला कोरोनाविषाणूंची चाचणी घेण्यात आली, तेव्हा त्यांचा जोम एका दिवसानंतर शमल्याचे आढळून आले. मात्र ५६० सें. आणि ७०० सें. अशा उच्च तापमानाला विषाणू काही मिनिटांतच सांसर्गिक क्षमता गमावून बसतो आणि निष्क्रिय होतो, असे आढळून आले. यावरून वाढलेली उष्णता कोरोनाविषाणूला मारक ठरते, असे दिसून येते.
युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग येथील सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या संशोधनानुसार विषाणू वहन माध्यमात वाढविलेल्या कोरोनाविषाणूंची (सार्स-कोवी-2) तापमानामुळे विषाणूंची जहालता (जोम) कशी बदलते, हे दाखविणारा चित्रमय तक्ता (चित्ररूपांतर: प्रणाली परब).
विषाणूच्या स्थिरतेवर इतर अनेक बाबींचे -जसे आर्द्रता, विषाणू ज्या पृष्ठभागावर पडले आहे (तुषार वगळता) ते साहित्य, आणि या साहित्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरली जाणारी जंतुनाशके यांचे –वेगळे, गोंधळात टाकणारे परिणाम दिसून येतात. उदाहरणार्थ, याच अभ्यासातून मास्क, चलनी नोटा, प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टील यांसारखे गुळगुळीत पृष्ठभाग अशा सर्वांवर असलेले विषाणूचे संसर्गजन्य कण दोन दिवसांनंतरही मिळवता येत असल्याचे म्हटले आहे. दुसरी एक चांगली बाब अशी की घरगुती जंतुनाशके काही मिनिटांच्या अवधीतच विषाणूंना कमकुवत करू शकतात, असे दिसले आहे. अशा प्रकारे वापरलेले मास्क कमीतकमी पाच मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवले आणि पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी ५% विरंजक द्रावण (ब्लिच) वापरले तर अधिकाधिक विषाणूंपासून मुक्तता होऊ शकते. या शोधनिबंधातील निष्कर्षांमध्ये प्रयोगशाळेतील कृत्रिम माध्यमात कोरोनाविषाणू (सार्स-कोवी-2) वाढवताना काही ठराविक तापमानाच्या नोंदी अनुकूल दिसून आल्या आहेत; उच्च तापमान आणि निर्जंतुकीकरणासाठी योग्य द्रावणांचा वापर विषाणूंना दुबळे करू शकतात.
महत्त्वाचे म्हणजे, आपण हे लक्षात घ्यायला हवे की ही सर्व निरीक्षणे प्रयोगशाळेतील नियंत्रित परिस्थितीत दिसून आली आहेत. प्रत्यक्ष दैनंदिन जीवन अतिशय गतिमान असल्याने ही निरीक्षणे वेगळी असू शकतात. त्यामुळे या निरीक्षणांवरून निष्कर्षाप्रत पोहोचणे म्हणजे अविचारी आणि अतिघाईचे ठरेल. कारण कोरोनाविषाणू मोठ्या संख्येने मानवी शरीरात असू शकतात आणि त्यांच्या प्रतिकृती बनवू शकतात. पर्यावरणाच्या तापमानात बदल होत असताना ते स्थिर राहू शकतात. साथरोगतज्ज्ञांमध्ये कोरोनाविषाणूच्या (सार्स-कोवी-2) ऋतुमानानुसार होणाऱ्या प्रसाराबाबत विविध मतप्रवाह आहेत. काही अभ्यासात उच्च तापमानामुळे कोरोनाविषाणूच्या रोगप्रसाराला आळा बसतो , असा निष्कर्ष मांडला आहे, तर काहींच्या मते मात्र अशी आशा करणे व्यर्थ आहे. यापैकी एक मतप्रवाह असाही आहे की कोरोनाविषाणू (सार्स-कोवी-2) जर त्याच्या कुलातील इतर साथीचे रोग पसरवणाऱ्या भाऊबंदांप्रमाणे हंगामी असला, तरी तो फक्त उत्तर गोलार्धातच आटोक्यात येऊ शकतो. दक्षिण गोलार्धात मात्र त्याचा तडाखा वारंवार बसू शकतो.
एकीकडे पुढील काही रखरखीत महिन्यांत आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे, हे पाहणेच आपल्या हाती असताना, दुसरीकडे लस किंवा औषध हेच आपले चिलखत असेल.
प्रीती रवी मूळच्या संशोधक असून आता विज्ञान प्रसारक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स, बंगळुरू येथून त्यांची न्यूरोजेनेटिक्स मध्ये पीएच. डी. पूर्ण केलेली आहे. सध्या प्रीती स्वतंत्रपणे विज्ञानप्रसाराचे कार्य करीत आहेत आणि त्याद्वारे आपल्या लेखनाचा छंद आणि विज्ञानाची आवड जोपासत आहेत. Twitter: @catchpreethir